Heart Attack : मध्य प्रदेशमधल्या इंदौरमध्ये एका हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका योग केंद्रात (Yoga Center) देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 73 वर्षांचे बलवीर सिंह छाबडा हे नाचताना अचानक जमिनीवर कोसळले. त्यांच्या हातात तिरंगा होता. त्यामुळे लोकं परफॉर्मन्सचा भाग असल्याचं समजत टाळ्या वाजवत राहिले. पण बलवीर सिंहा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदौरमधल्या फूटी कोठी परिसरातील ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेजवर परफॉर्म करताना कोसळले
आस्था योग क्रांतीच्या सदस्यांनी बलवीर सिंह यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या तपासणीत बलविर सिंह यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) झाल्याचं निष्पन्न झालंय. देशभक्ती कार्यक्रमात बलविर सिंह 'माँ तुझे सलाम' या गाण्यावर परफॉर्म करत होते. त्यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक त्यांना टाळ्या वाजवून साथ देत होते. 


गाणं संपतानाा अचानक बलविर सिंह जमिनीवर कोसळले. लोकांना या त्यांच्या परफॉर्मन्सचा भाग वाटला. बराच वेळ उपस्थित लोकं टाळ्या वाजवत राहिले. पण गाणं संपल्यानंतरही बलविर सिंह उठत नसल्याने स्टेजवरच्या एका व्यक्तीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची कोणतीच हालचाल जाणवली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने इतरांच्या मदतीने बलविर सिंह यांना रुग्णालयात नेलं. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरानी हा सायलेंट हार्टअटॅक असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 



सायलेंट हार्टअटॅक म्हणजे काय?
सायलेंट हृदयविकाराचा (Silent Heart Attack) झटका खूप धोकादायक ठरतो. कारण तो ओळखणं फार कठीण होऊन बसते. बऱ्याच वेळा लोक सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते आणि दुर्लक्ष केलं जाते. एका अभ्यासानुसार, सुमारे 45 टक्के लोकांमध्ये हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, लोकांना हृदयविकाराचा झटका आधी ओळखता येत नाही. लोकांना योग्य उपचारही मिळत नाहीत आणि मग दुसरा हृदयविकाराचा झटका धोकादायक ठरतो. 


सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
- सायलेंट हृदयविकाराच्या झटक्यामध्ये, कधीकधी छातीत दुखण्याऐवजी जळजळ जाणवते.
- पीडित व्यक्ती एकाच वेळी खूप अशक्त आणि थकल्यासारखे वाटू शकते.
- अनेक वेळा सायलेंट ॲटॅकमुळे ॲसिडिटी, अपचन, डिहायड्रेशन आणि थकवा येतो.
- जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो तेव्हा सायलेंट हृदयविकाराचा झटका धोकादायक ठरू शकतो.
- सायलेंट हृदयविकाराच्या आधी आणि नंतर बहुतेक लोकांना सामान्य वाटते.
- सायलेंट हृदयविकाराच्या झटक्यानंतर, दुसरा हृदयविकाराचा धोका वाढतो.