Loan App Scam : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी असं सुखी कुटुंब. पण एका चूकीने संपूर्ण कुटुंब उद्धव्स्त झालं. कुटुंब प्रमुखाने मुलांना विष देऊन त्यांची हत्या (Murder) केली नंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधलं हे कुटुंब मोबाईल लोन अॅपच्या (Loan App) जाळ्यात फसलं होतं. या जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्या व्यक्तीने पूरेपूर प्रयत्न केला. पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मिळत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने चार पानांचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र  (Suicide Note) आपल्या सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारं आहे. लोन अॅपचं जग किती भयानक आणि जीवघेणं आहे, हे यावरुन समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार पानांची सुसाईड नोट
मध्यप्रदेशमधल्या भोपाळ इथं राहाणारे भूपेंद्र विश्वकर्मा (38) आणि त्यांची रितू (35) यांनी आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहिलंय त्यात त्यांनी आपली संपूर्ण व्यथा मांडली आहे. 
आमच्या या लहान आणि सुखी कुटुंबाला कोणाची नजर लागली. मी माझ्या सर्व नातेवाईकांची माफी मागतो, एका छोट्या चुकीमुळे मला तुमच्यापासून दूर जावं लागतंय. अगदी आनंदात माझं कुटुंब जगत होतं, कोणत्याच गोष्टीची चिंता नव्हती. अचानक एका मेसेजने आमच्या आयुष्यात वादळ आलं. एप्रिल महिन्यात भूपेंद्र विश्वकर्मा यांच्या मोबाईलवर एक WhatsApp मेसेज आला. यात ऑनलाईन काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. हाच मेसेज पुन्हा टेलीग्रामवरही आला. चांगली पैसे आणि गरज असल्याने भूपेंद्र यांनी त्या मेसेजवरची लिंक उघडली. जास्त वेळ द्यावा लागणार नसल्याने त्यांनी हे काम सुरु केलं. 


सुरुवातीला त्यांना यातून थोडा फायदा झाला. पण हळू-हळू ते या दलदलीत फसते गेले. जेव्हा केव्हा त्यांना मोफत वेळ मिळत होता, तेव्हा तेव्हा ते ऑनलाईन काम करत होते. हळूहळू कामाचा लोड वाढला आणि भूपेंद्र त्यात गुंतत गेले. सुरुवातीला त्यांना यात पैसे टाकण्यास सांगण्यात आलं. नंतर काम पूर्ण करण्याचा मेसेज येऊ लागला. यादरम्यान ज्या कंपनीत भूपेंद्र काम करत होते ती कंपनी बंद झाली. त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली. हप्ते थकत गेल्याने त्यांचा सिविल स्कोरही खराब झाला. यादरम्यान ऑनलाईन काम देणाऱ्या कंपनीनेच भूपेंद्रना लोन ऑफर केली. सुरुवातील भूपेंद्र यांनी नकार दिला, पण पैशांची कमी आणि  झटपट लोन मिळत असल्याने भूपेंद्र यांनी लोन अॅपमधून लोन घेतलं. पण हे सर्व पैसे तो त्याच कंपनीत ऑनलाईन कामं घेण्यासाठी गुंतवू लागला. 



ही ऑनलाईन कंपनी कोविड काळानंतर कोलंबियातून सुरु असल्याची भूपेंद्र यांनी काढली. कंपनी चांगली वाटल्याने त्यांनी काम सुरु केलं. आपण काय काम करतोय, कुठे पैसे गुंतवतोय याची कल्पना त्यांनी पत्नीलाही दिली नव्हती. पत्नी जेव्हाही विचारायची तेव्हा कुटुंबाच्या सुखासाठी आपण सर्व करत असल्याचं उत्तर भूपेंद्रे देत होता. 


आतापर्यंत बरंच ऑनलाईन काम भूपेंद्र यांनी केलं होतं. सुरुवातीला थोडेफार पैसे मिळाले तेवढंच, पण त्यानंतर त्यांना पैसे देण्यात आले नाहीत. सर्व पैसे एकदम मिळतील आणि सर्वांचे कर्ज चुकवून टाकू अशा भोळ्या अपेक्षेने त आला दिवस कसा तरी ढकलत होते. पण त्यांच्यावरचं कर्ज वाढतच गेलं. ऑनलाईन कंपनीकडून पैसे घेतले आणि त्याच कंपनीत गुंतवत गेले. आपण यात पूर्णपण अडकल्याचं भूपेंद्र यांच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रिकव्हरी एजंटकडून भूपेंद्र यांनी लोन चुकतं करण्यासाठी धमक्या दिल्या जाऊ लागल्या. 


त्यानंतर त्यांनी फोन हॅक करुन त्यातील सर्व नंबर मिळवले. लोन चुकतं केलं नाही तर तुझा अश्लील फोटोन बनवून तो सर्व नातेवाईक आणि मित्रांना पाठवला जाईल अशी धमकी भूपेंद्रला दिली जाऊ लागली. धक्कादायक म्हणजे भूपेंद्र यांच्या आधीच्या कंपनीच्या बॉसच्या डीपीचा फोटो घेऊन त्याचा चुकीचा वापर करण्यात आला. नातेवाईकांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या सर्व प्रकारामुळे भूपेंद्र नैराश्यात गेले. 


याची तक्रार करण्यासाठी भूपेंद्र सायबर क्राईम कार्यालयात गेले. पण तिथला अधिकारी सुट्टीवर असल्याने तक्रार नोंदवण्यात आली नाही. यानंतर वकिलांकडे गेले, वकिलांनी ड्राफ्टिंग करण्यासाठी वेळ मागितला. या सर्व प्रकारामुळे भूपेंद्र खचले. नातेवाईक, मित्रमंडळी दोष देऊ लागल्याने त्यांनी त्यांच्याशीही बोलणं बंद केलं. 


शेवटी भूपेंद्र यांनी टोकाचा निर्णय उचलण्याचा निर्णय घेतला. आपण मेलो तर आपल्या कुटुंबाचं काय होईल या विचाराने त्यांनी संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचं ठरवलं. त्यांनी आधी दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केली. नंतर पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली.