व्हिडिओ: मातीच्या भाकरी खाऊन लोक भरतात पोट
कोलंबसला अशिया आणि भारताचा शोध हैतीमधूनच लागला होता.
नवी दिल्ली: भूकबळी हा जगासमोरचा एक मोठाच प्रश्न. जवळपास जगभरातील प्रत्येक देश या प्रश्नावर संघर्ष करतोय. वाढत्या महागाईमुळे जनतेचा कणा मोडतो. अर्थव्यवस्था विस्कटते. अशा वेळी पोट कसे भरायचे याची भ्रांत प्रत्येक गरीब नागरिकाला पडते. कँरेबियन आयलँड हैती हासुद्धा असाच एक देश. हा देशही भूकबळीशी संघर्ष करतोय. इथल्या लोकांची व्यथा इतकी वाईट आहे की, लोकांना खायला अन्नच मिळत नाही. त्यामुळे इथल्या लोकांनी एक वेगळाच पर्याय निवडला आहे.
मातीत पाणी, मिठ घालून भाकऱ्यांची निर्मीती
गरीबीने हैराण असलेले इथले लोक मातीच्या चिखलापासून बनवीलेली भाकरी खातात. हैतीमधली गरीबी दाखवणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही आपल्य ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसते की, लोक मातीत पाणी आणि मिठ टाकून भाकरी बनवत आहेत. या ओल्या भाकरी उन्हात वाळवल्या जातात.
क्रिकेटपटू सेहवागने शेअर केला व्हिडिओ
या भाकरी पूर्ण वाळल्या की, मग त्या मिठासोबत खाल्ल्या जातात. महत्त्वाचे असे की, कोलंबसला अशिया आणि भारताचा शोध हैतीमधूनच लागला होता. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने हा व्हडिओ शेअर करताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. विरेंद्र सेहवाग म्हणतो की, 'गरीबी! हैतीमध्ये मातीत पाणी आणि मिठ घालून भाकऱ्या बनवल्या जातात. जे इथले लोक खातात. कृपया.. कृपा करून अन्न वाया घालवू नका.'
कोंबड्यांच्या झुंजीसाठी प्रसिद्ध
दरम्यान, हैती हा देश कोंबड्यांच्या झुंजींसाठी प्रसिद्ध आहे. इथे जंगल बरेच कमी आहे. शेतीचे तंत्रज्ञान अगदीच मागास आहे. संयुक्त राष्ट्र (यूएन)च्या एका अहवालानुसार, हा देश भूमाफियांच्या छायेत राहात आला आहे. इथले ६०.७ टक्के लोक निरक्षर आहेत.