मुकेश अंबानींचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढला, एवढं वेतन मिळणार
मुकेश अंबानी पुढच्या ५ वर्षांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चे चेअरमन, व्यवस्थापन संचालक म्हणून कायम राहणार आहेत.
मुंबई : मुकेश अंबानी पुढच्या ५ वर्षांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चे चेअरमन, व्यवस्थापन संचालक म्हणून कायम राहणार आहेत. कंपनीच्या शेअरधारकांनी मुकेश अंबानींचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवायला मंजुरी दिली आहे. ६१ वर्षांचे अंबानी १९७७ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. जुलै २००२ साली रिलायन्स समुहाचे संस्थापक आणि मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई अंबानींचं निधन झालं. यानंतर मुकेश अंबानींना कंपनीचं चेअरमन बनवण्यात आलं.
मुकेश अंबानींना ९८.५ टक्के समर्थन
मुंबईत झालेल्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींचा कार्यकाळ वाढवण्याच्या बाजूनं ९८.५ टक्के मतं पडली. मुकेश अंबानींचा कार्यकाळ आता एप्रिल २०१९ ला संपेल.
अंबानींना मिळणार एवढं वेतन
मुकेश अंबानींना वर्षाला ४.१७ कोटी रुपये वेतन आणि ५९ लाख रुपये भत्ता म्हणून मिळतील. यामध्ये सेवानिवृत्ती लाभ समाविष्ट नाही. याचबरोबर मुकेश अंबानींना नफ्यावर आधारित ठराविक बोनसही मिळणार आहे. याचबरोबर अंबानींच्या व्यावसायिक यात्रेसाठी परिवार आणि सहाय्यकांचा राहण्याचा खर्चही कंपनी उचलणार आहे. कंपनी मुकेश अंबानींसाठी गाडी, घरचा फोन आणि इंटरनेटचा खर्चही करणार आहे.
अंबानी आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेचा खर्च या भत्त्यांमध्ये समाविष्ट नाही. पण याचा खर्चही कंपनीच करणार आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डिबेंचर्समधून २० हजार कोटी रुपये जमा करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या पैशांचा कुठे वापर होणार याबाबत मात्र कंपनीनं काहीही सांगितलं नाही.