मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे मुंबईतून जाणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना अधिकचे विमान प्रवास भाडे द्यावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील विमानतळ येत्या ३० मार्चपर्यंत आठवड्यातून तीन दिवस दुपारच्या वेळी बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईत उतरणाऱ्या किंवा मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवर परिणाम होईल. त्यामुळेच कमीत कमी विमानांच्या साह्याने मुंबईत काम करावे लागणार असल्यामुळे तिकिटांचे दर चढे राहणार आहेत. साधारणपणे विमान प्रवास भाड्यात २५ ते ३० टक्के वाढ होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ३० मार्चपर्यंत मुंबईतील धावपट्टी दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे. आजपासूनच या कामाला सुरुवात होते आहे. त्यामुळे या दिवशी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचे भाडे द्यावे लागू शकते. या कालावधीत विमानतळावरील दोन धावपट्ट्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबई विमानतळ देशातील सर्वाधिक व्यग्र म्हणून बघितले जाते. रोज हजारो विमाने या विमानतळावर उतरतात आणि तितकीच विमानतळावरून उड्डाण करतात. त्यामुळे या बंदच्या काळात अंदाजे ५००० विमानांचे कामकाज रद्दच होईल. त्याचा परिणाम प्रवाशांच्या येण्या-जाण्यावर होईल.


मुंबई विमानतळावरील धावपट्टीची दर ७ वर्षांतून एकदा दुरुस्ती केली जाते. यंदा ७ फेब्रुवारी ते ३० मार्च या काळात हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या काळात कोणतेही विमान मुंबई विमानतळावर उतरू शकणार नाही किंवा उड्डाण करू शकणार नाही.