अदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार
अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे.
संदीप विश्वकर्मा, झी मीडिया | वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूह करणार आहे. समूहाची कंपनी अदानी रियल्टीने पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे. परंतु या कराराला एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. एमएसआरडीसी पुढील बैठकीत अंतिम मंजुरी देईल अशी अपेक्षा आहे.
वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलचे क्षेत्रफळ सुमारे 45 लाख स्क्वेअर फूट पसरले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, कंपनी या क्षेत्राचा वापर व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता म्हणून करेल. विशेष म्हणजे, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाच्या शर्यतीत L&T रियल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज, JSW, रहेजा कॉर्पसह 18 कंपन्यांनी बोली लावली होती. करार जिंकण्यासाठी L&T ने 18% महसूल शेअर करण्यासाठी बोली लावली होती, तर अदानी रियल्टीने 22.79% महसूल वाटा देऊ केला होता.
जर आपण दोन्ही कंपन्यांच्या नेट वर्थबद्दल बोललो तर L&T ची एकूण संपत्ती 84,000 कोटी रुपये आहे तर अदानी रियल्टीची नेट वर्थ 48,000 कोटी रुपये आहे. मुंबई पुनर्विकासासाठी अदानी समूहाला ही दुसरी मोठी निविदा प्राप्त झाली आहे. यापूर्वी 2022 मध्ये, अदानी प्रॉपर्टीजने धारावी, आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी बोली जिंकली होती. कंपनीने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून धारावी पुनर्विकास प्रकल्प जिंकला होता. त्यानंतर अदानी समूहाचं हे दुसरं मोठं यश म्हणावं लागेल.