नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात ८४ वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना जितकी साधी वाटत होती तितकी ती सोपी नव्हती. या हत्येचा तपास करून सुद्धा पोलिसांना आरोपीचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र या एका पुराव्याने हत्येचा उलगडा केला, मात्र ज्यावेळीस आरोपीला पाहिलं त्यावेळी कुटूंबासह पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीतल्या या मर्डर मिस्ट्रीने सर्वांनाच धक्का दिला होता. शालिमार भागात एकट्या राहत असलेल्या या 84 वर्षीय आजींची 8 जुलैला गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या घटनेत घटनास्थळावरून दिल्ली पोलिसांनी काहीच पुरावे मिळत नव्हते. घरात जोर जबरदस्ती घुसण्याच्याही काही खुणा नव्हत्या. त्यामुळे पोलिसांना ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यात वेळ लागत होता.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने प्रॉपर्टी वरून होणारा वाद टाळण्यासाठी आधीच सर्व मुलांना मालमत्ता विकून कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक केले होते. तर वृद्ध महिला स्वत: एकटीच शालिमार बाग परिसरात राहायची. प्रॉपर्टीमध्ये समसमान वाटप झाल्याने यावरून हत्या होण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही पोलिसांनी आजीच्या मुलांची चौकशी केली. मात्र कुणावरही खुनाचा संशय आला नाही. तसेच पोलिसांना कोणताही सुगावाही लागला नाही.


हत्येचं असं गूढ उलगडलं 
सर्व मार्गाने तपास करून केसचा उलगडा होत नव्हता. त्यामुळे पोलिसांचा आणखीण गुंता वाढला होता. त्यानंतर पोलिसांनी इमारतींचे सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. या तपासात त्यांना एक धागा सापडला. सीसीटीव्हीत एक संशयित चेहरा झाकून पांढऱ्या टॉवेलने खुनाच्या आदल्या रात्री साडेनऊ वाजता तिच्या घरात शिरताना दिसला होता. यानंतर रात्री 11.20 वाजता बाहेर येताना देखील दिसला. त्यानंतर रात्री 12.20 वाजता संशयित पुन्हा घरात घुसून काही वेळाने निघून गेल्याचे दिसले.


आरोपीला पाहून कुटूंबाला धक्का बसला 
पोलिसांनी सर्व कुटुंबियांना सीसीटीव्हीतील संशयीत आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलवले होते. यावेळी कुटुंबीयांनी संशयिताची ओळख सांगताच पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. संशयित हा दुसरा तिसरा कोणी नसून वृद्ध महिलेचा नातू असल्याचे समोर आले आहे.  


असा रचला हत्येचा कट 
नातवाच्या मित्रांनी उसणे घेतलेल्या पैशाची मागणी केली होती. हे पैसे देता येत नसल्याने मित्रांनीच त्याला आजीकडून घेण्याची कल्पना दिली होती, पैसे न दिल्यास तिची हत्या करून तिला लुटण्याचा प्लॅन देखील आखला होता. प्लॅनुसार नातू आजीच्या घरी गेला त्याने पैशाची मागणी केली. मात्र आजीने पैसे न दिल्याने नातवाने तिला धक्का देत तिच्या मानेवर ब्लेडने वार करत तिची हत्या केली. 


हत्येनंतर आरोपीने मित्रांना व्हिडिओ कॉलकरून आजीचा मृतदेह दाखवला. आजीची हत्या झाल्याची व्हिडिओ कॉलकरून खात्री झाल्यानंतर सर्व मित्रांनी घरात येऊन आजीच्या घरातील 1 लाखाची रक्कम लांबवली.  


दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या चार मित्रांना अटक केली आहे. तसेच ब्लेड, अल्पवयीन मुलाचे रक्ताने माखलेले कपडे, लुटलेले 50 हजार रुपये, स्विफ्ट डिझायर कार जप्त केले.