पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मालदामध्ये एका सक्रिय भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या शरिरावर अॅसिड टाकण्यात आलं आहे. इंग्लिशबाजार ठाणे परिसरातल्या कमलाबाडीच्या जदुपूरमध्ये ही घटना घडली आहे. असीम सिंह असं मृत भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून निदर्शन सुरु झाली आहेत. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा सुरु केला आहे. पोलिसांकडून अश्रृधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आहे. यानंतर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. सध्या पश्चिम बंगालमधील वातावरण बिघडलं आहे.
असीम सिंह रविवारपासून बेपत्ता होते. आज सकाळी त्यांच्या घरापासून जवळच त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. भाजपनं असीम सिंह यांच्या हत्येचा आरोप तृणमूल काँग्रेसवर लावला आहे. भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली.
असीम यांचा मृतदेह मिळाल्यानतंर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ममता सरकार विरोधात घोषणाबाजी केली. याआधी बर्दवानमध्ये भाजपचे अध्यक्ष संजय दास यांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला होता. त्यांच्या घरावर देशी बॉम्ब टाकण्यात आला होता.
मुकुल रॉय यांची कारवाईची मागणी
ममता बॅनर्जी यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे तृणमुलचे कार्यकर्ते हल्ले करत आहेत. याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देखील लिहिलं आहे.