उत्तर प्रदेश : गेल्या काही वर्षांपासून देशात बेताल वक्तव्य करण्य़ाचं प्रमाण वाढलं आहे. प्रत्येक क्षेत्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती समोर येत आहेत. अनेकदा अशी बेताल वक्तव्य फक्त वैयक्तिक, राजकीय किंवा चर्चेत राहण्यासाठी केले जातात. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. उपकुलगुरुंनी विद्यार्थ्यांना हत्या करण्याचा अजब सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील जोनपूरमधील वीर बहादुर सिंह पूर्वांचल विद्यापीठचे उपकुलगुरु राजा राम यादव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गाजीपूर विद्यापीठातंर्गत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राजाराम यादव यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं की, 'जर तुम्ही  पूर्वांचल विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर,  रडत रडत माझ्याकडे येऊ नका. तुमचं भांडण झाल्यास, त्या संबंधितास चोप द्या.  इतकेच नाही तर  हत्या करा, यानंतर मी पाहून घेईन'. उपकुलगुरु गाजीपूरमधील सत्यदेव कॉलेजच्या आवारात सत्यदेव आणि डॉ. राम मनोहर लोहिया कॉलेजच्या संयुक्त कार्यशाळेला संबोधित करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



महाशय इतक्यावरच न थांबता उपकुलगुरु म्हणाले की,  तुम्हाला शक्य असेल ते करा, ऐवढंच नाही तर त्याची हत्या करा, पुढचं पुढे आपण पाहून घेऊ. असं त्यांनी म्हटलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ २९ डिसेंबरचा आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राजाराम यादव यांना २०१७ मध्ये पूर्वांचल विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्त केले होते. याआधी राजाराम यादव हे इलाहाबाद (प्रयागराज) विद्यापीठात फिजिक्स विभागाचे प्राध्यापक होते.


हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ जवळपास ९०० पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. याविरोधात लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जर उपकुलपतींनीच असे वक्तव्य केले तर, विद्यार्थ्यांनी कोणाकडून आदर्श घ्यावा,  असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.