`कितीही कायदे करा, मुस्लिम मुलं जन्माला घालायचं थांबवणार नाहीत`
मुस्लिम समाजातही आता सुशिक्षितांची संख्या वाढत आहे.
गुवाहाटी: सरकारने कितीही कायदे केले तरी मुस्लिम समाजातील लोक जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायचे थांबवणार नाहीत, असे वक्तव्य ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी केले आहे. दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी न देण्याचा प्रस्ताव नुकताच आसाम सरकारकडून मांडण्यात आला होता. लवकरच हा प्रस्ताव विधानसभेत येणार आहे. आसाममध्ये भाजप सरकार बहुमतात असल्याने हा कायदा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे.
बद्रुद्दीन अजमल यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, मुस्लिम मुलांना जन्म घालायचे थांबवणार नाहीत. ते कोणाचेही ऐकणार नाहीत. सरकारने आता मुस्लिमांना सरकारी नोकरीपासून दूर ठेवण्यासाठी कायदा केला आहे. सच्चर समितीच्या अहवालानुसार २ टक्क्यांच्या खाली लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. मुस्लिम समाजातही आता सुशिक्षितांची संख्या वाढत आहे, असे बद्रुद्दीन अजमल यांनी सांगितले.
त्यामुळे सरकारच्या धोरणाचा मुस्लिम समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. ते जास्तीत जास्त मुले जन्माला घालतच राहणार. ज्याला जगात यायचे आहे तो येणारच. त्याला कोणाही रोखू शकत नाही, असे आमचा धर्म मानतो. निसर्गाच्या कार्यात अडथळा आणणे योग्य नव्हे. काहीही करून मुस्लिम त्यांच्या मुलांचे पालनपोषण करतील. त्यामुळे मुस्लिम समाज जास्त मुले जन्माला घालत असल्याबद्दल आरडाओरड करू नका, असे बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. एकीकडे मोहन भागवत हिंदूंना १०-१० मुले जन्माला घालण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, असा आदेश काढला जातो. त्यामुळे सरकारला नक्की काय हवे, ते आधी ठरवावे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितल्यानुसार वागत नाहीत, असा टोलाही बद्रुद्दीन अजमल यांनी लगावला.