नवी दिल्ली : देवाण-घेवाण करताना अनेकदा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. फाटलेली नोट बदलायची असल्यास कोणत्याही बँकमध्ये बदलून दिली जाऊ शकते. बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकने सर्व बँकांना अशाप्रकारच्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच सर्व बँकांमध्ये या सुविधेबाबत नोटीस लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा बँका फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार समोर आल्या आहेत. फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात जावं लागेल असं बँकांकडून अनेकदा ग्राहकांना सांगण्यात येतं. अशा परिस्थितीत ग्राहकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. काही लोक बाहेरुन नोट बदलून देणाऱ्यांकडून, नोटा बदलून घेतात. परंतु अशावेळी अनेकदा पैशांची पूर्ण रक्कम मिळत नाही.


RBIच्या नियमांनुसार, ज्या बँक फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नकार देतील त्यांची तक्रार बँकिंग लोकपाल किंवा RBIच्या तक्रार पोर्टलवर करता येऊ शकते.


RBIच्या नोट रिफंड २०१८च्या नियमांअंतर्गत बँकांना नोट बदलण्याची गरज आहे. नोटेच्या फाटलेल्या भागाच्या आधारे त्याचं रिफंड दिलं जातं. नियमांनुसार, ५० रुपयांपेक्षा खाली आणि त्यावर असलेल्या नोटांसाठी रिफंडचे वेग-वेगळे नियम आहेत.


५० रुपयापेक्षा अधिक किंमत असलेल्या नोटा बदलायच्या असल्यास आणि नोटेचा ८० टक्के भाग चांगला असल्यास बँक पूर्ण रिफंड देते. फाटलेल्या नोटेचा ४० टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल. जर नोटेचा ४० टक्क्यांहून छोटा भाग असल्यास त्याचे रिफंड मिळणार नाही.