नवी दिल्ली: भारतीय लष्कराला अगदी कोणत्याही क्षणी कारवाई करण्यासाठी सज्ज ठेवणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया देशाचे नवे लष्करप्रमुख मनोज मुकूंद नरवणे यांनी दिली. मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी नरवणे यांनी म्हटले की, कामकाजातील तत्परता ही काही तात्पुरती गोष्ट नाही. यासाठी दैनंदिनच नव्हे तर अनेक महिनोनमहिने काम करत राहावे लागते. या सगळ्याला आधुनिकीकरण, अद्ययावत उपकरणे, उत्तम रणनीती आणि जवानांच्या चांगल्या मनोधैर्याची साथ लाभणे गरजेचे आहे. तेव्हाच लष्कराच्या तत्परतेसंदर्भातील उच्च निकषांचे पालन करणे शक्य आहे, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन 'बॅचमेट' सांभाळणार देशाच्या संरक्षणाची धुरा


या मुलाखतीत लष्करप्रमुख नरवणे यांनी देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या शेजारी देशाकडून दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध लढले जात आहे. याशिवाय, सीमारेषेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. सीमारेषेपलीकडे अनेक दहशतवादी तळ अस्तित्वात आहेत. येथील दहशतवादी सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, भारतीय लष्कर अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असा दावा लष्करप्रमुखांनी केला. 



तसेच अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याचेही त्यांनी म्हटले. हिंसक घटनांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. काश्मीरच्या जनतेसाठी हे चांगले लक्षण आहे. भविष्यात याठिकाणी शांतता आणि समृद्धी नांदण्याच्यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचेही यावेळी लष्करप्रमुख मनोज मुकूंद नरवणे यांनी सांगितले.