शहीद शंकर सिंह यांचा आईसोबतचा हा ठरला अखेरचा संवाद
दहशतवाद्यांशी दोन हात करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला
जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलांना यश आले. यामध्ये पिथारौड येथे राहणारे जवान शंकर सिंह महरा देखील शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांशी दोन हात करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला होता. हाच संवाद त्यांचा शेवटचा ठरला.
आई, फायरिंग सुरु झालीय...आता मी फोन ठेवतो...नंतर करेन ! हे शहीद शंकर सिंह महरा यांचे शेवटचे शब्द ठरले. आपला मुलगा शहीद झाल्याचे समजताच घरी असलेली आई आणि पत्नी बेशुद्ध झाल्या. त्या काहीच व्यक्त करण्याच्या मनस्थितीत नाहीत. माजी सैनिक असलेल्या त्यांच्या वडीलांचे डोळे पाणावले आहेत. पाच वर्षाचा मुलगा अबोल भावना व्यक्त करतोय. देशभरातून या शहीदांप्रती दु:ख व्यक्त केले जात आहे.
२१ कुमाऊ रेजिमेंटमध्ये ड्यूटीवर असलेले शंकर सिंह महरा हे सैन्य परिवारातील होते. त्यांचे वडील मोहन सिंह हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचा छोटा भाऊ नवीन सिंह देखील राष्ट्रीय रायफलमध्ये असून सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात आहे. त्यांचे पार्थिव शरीर घरी आणले जात आहे.
शंकर सिंह महरा हे ११ वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले. सात वर्षांपुर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षाचा हर्षित नावाचा मुलगा आहे. त्यांच्या शहीद होण्याच्या वृत्ताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुट्टी संपवून दीड महिन्यांपूर्वीच कामावर रुजू झाले होते.
जवान शहीद
शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस आतमध्ये गेले होते. यावेळी त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. त्यामुळे भारतीय जवान घरातच अडकून पडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. यानंतर आज सकाळी हे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वजण घरात शिरल्यानंतर आधीपासूनच तिथे लपून बसलेल्या दहशतवादयांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. मात्र, घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.