`या` सरपंचाने दिली थुंकी चाटण्याची शिक्षा
शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली : शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्हा असलेल्या नालंदामध्ये एका व्यक्तीला धक्कादायक शिक्षा सुनावण्यात आली आहे. ANI या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, एक व्यक्ती दरवाजा न ठोठावता गावातील सरपंचाच्या घरात शिरला. त्यानंतर सरपंचाच्या घरातील महिलांनी त्याला पकडले आणि बदडले.
या आरोपी व्यक्तीला केवळ मारहाण केली नाही तर एक धक्कादायक शिक्षाही सुनावण्यात आली. ही शिक्षा म्हणजे जमीनीवरील थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
या व्यक्तीने थुंकी चाटण्यास नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. अखेर त्या व्यक्तीने सर्वांसमोर जमिनीवरील थुंकी चाटली. या घटनेचे फोटोज मीडियात आल्यानंतर सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की नाही यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या घटनेनंतर पीडित व्यक्ती खचला आहे. या घटनेनंतर काहींनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, जर या व्यक्तीने काही चूक केली होती तर त्याला पोलिसांत द्यायला हवं होतं. मात्र, अशा प्रकारे शिक्षा देणं चुकीचं आहे.
या प्रकरणी बिहार सरकारमधील मंत्री नंदकिशोर यादव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.