झी 24 तास इम्पॅक्ट : शहरात खुलेआम गुटखाविक्री करणाऱ्यांवर कारवाई
गुरुवारी दिवसभर शहरात या कारवाया सुरु होत्या.
नांदेड : गुटख्यामुळे वाढणारे कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता राज्य शासनाने याबाबत गंभीर पाऊले उचलली. राज्यात गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात पानटप-यांवर कशी खुलेआम गुटखा विक्री सुरु होती. मुळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीत हा गुटखा विकला जात होता. या प्रकरणी अनेक तक्रारीही दाखल करण्यात येत होत्या. पण यावर काही ठोस कारवाई होताना दिसत नव्हती. काही दिवसांपूर्वीच याचा 'झी 24 तास'ने पर्दाफाश केला होता. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. नांदेड मध्ये प्रत्येक पानटपऱ्यांवर प्रतिबंधीत गुटखा मिळत असल्याचे 'झी 24 तास'ने उघड केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील बड्या पानटप-यांवर छापे मारले. गुरुवारी दिवसभर शहरात या कारवाया सुरु होत्या.
कारवाई सुरू राहणार
या पानटपऱ्यांवरुन गुटखा जप्त करण्यात आला. या सर्वांवर अन्न औषध प्रतिबंधाक कायदा आणि आय.पी.सी च्या कलम 328 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 'झी 24 तास'च्या बातमीनंतर ही कारवाई करण्यात आली असून यापुढे नियमीत छापे मारण्याची कारवाई सुरु राहील अशी माहीती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्य्क आयूक्त बोराळकर यांनी दिली.