नरेंद्र मोदी घाबरट, हिंमत असेल माझ्याशी १० मिनिटे चर्चा करुन दाखवा- राहुल गांधी
एखादा माणूस त्यांच्यापुढे ठामपणे उभा राहिला तर ते स्वत: पळ काढतात.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांना मी चांगलेच ओळखले आहे. ते एक घाबरट व्यक्ती आहेत. एखाद्याने त्यांच्यासमोरून मागे हटायला नकार दिला तर ते लगेच पळ काढतात, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मी भाजपला आव्हान देतो की, माझ्यासमोर मोदींना १० मिनिटे चर्चेसाठी उभे करा. मात्र, मोदी घाबरट व्यक्ती आहेत. मी त्यांचा हा स्वभाव ओळखला आहे. एखादा माणूस त्यांच्यापुढे ठामपणे उभा राहिला तर ते मागच्यामागे पळ काढतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
...जेव्हा राहुल गांधी 'रामभक्त' आणि कमलनाथ 'गो भक्त' होतात!
यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (आरएसएस) टीका केली. गेल्या काही वर्षांपासून संघाकडून पद्धतशीरपणे देशातील प्रत्येक संस्थेत स्वत:च्या लोकांना घुसवले जात आहे. जेणेकरून भविष्यात सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपूरमध्ये बसून रिमोट कंट्रोलने देशाचा कारभार चालवता येईल, असे राहुल यांनी सांगितले. अशावेळी देशातील संस्थांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कारण देशातील संस्था या काही कोणत्या पक्षाच्या मालकीच्या नाहीत, त्या संपूर्ण देशाच्या आहेत. भाजपवाले स्वत:ला देशापेक्षा श्रेष्ठ समजतात. मात्र, येत्या तीन महिन्यांत देश हाच सर्वोच्च असतो, हे त्यांना समजेल. भारताचे पंतप्रधान देश तोडण्याची भाषा करू नाहीत. जर ते असे करत असतील तर त्यांना हटवले जाईल. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी, भाजप आणि संघाचा पराभव करेल, असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.
मोहन भागवत म्हणतात, ... म्हणून अयोध्येत मूळ जागीच मंदिर झाले पाहिजे