नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत देशातून मतांच्या सर्वाधिक टक्केवारीसह मी निवडून आलो होतो. मात्र, सरकारने टेलिव्हिजनवर काम केलेल्या अभिनेत्रीला मंत्री केले. मी काय वाईट होतो, असा सवाल भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी एबीपी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. त्यांनी म्हटले की, मी अजूनही मनाने भाजपशी जोडलेला आहे. मात्र, पक्षातून काढून टाकण्यात आले तर मला त्याची फिकीर नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी देशभरातून सर्वाधिक मतांच्या टक्केवारीसह निवडून आलो होतो. तरीही सरकारने मला मंत्रीपद दिले नाही. याउलट टेलिव्हिजनवरील एका अभिनेत्रीला थेट मनुष्यबळ विकास खाते देण्यात आले. त्यावेळी मी काय वाईट होतो, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सरकारने मला मंत्रीपद दिले असते तरी फरक पडला नसता. कारण हल्ली मंत्र्यांची स्वतंत्र अशी ओळख राहिलेली नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला. तसेच सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही. तो केवळ प्रोपोगंडाचा एक भाग होता. परंतु, एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मला साधे मंत्रीपद मिळू शकत नाही का, असे सिन्हा यांनी विचारले. 


यापूर्वी मला अनेकदा थेट पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. मात्र, त्यांनी भेटीसाठी कधीच वेळ दिली नाही. त्याऐवजी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे जायला सांगितले जाते. मात्र, मला थेट पंतप्रधानांशीच बोलायला आवडेल, असेही सिन्हा यांनी सांगितले.