Narendra Modi Fairwell Speech On Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देणारं भाषण केलं. यावेळेस मोदींनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या मनमोहन सिंग यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी, 'ते 6 वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद राहिले, मात्र त्यांचं देशासाठीचं योगदान फारच मोठं आहे,' असं म्हणत माजी पंतप्रधानांना निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.


कोरोना काळात एकमेकांना समजून घेतलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेवानिवृत्त होत असलेल्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी विशेष शुभेच्छा दिल्या. जाणाऱ्या या खासदारांना जुन्या आणि नव्या अशी दोन्ही सभागृहं पाहता आली. तिथं त्यांना काम करता आलं. तसेच ते स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाचे साक्षीदार राहिले. कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये आपण सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं. या परिस्थितींनुसार खासदारांनी स्वत:ला संभाळून घेतलं. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही खासदाराने देशाचं काम थांबवलं नाही, असं म्हणत मोदींनी निवृत्त होणाऱ्या खासदारांचं कौतुक केलं.


व्हीलचेअरचा केला उल्लेख


निवृत्त होत असलेल्या खासदारांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. मनमोहन सिंग यांच कौतुक करताना, "डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेकदा संसदेला मार्गदर्शन केलं आहे. जेव्हा जेव्हा संसदेनं दिलेल्या योगदानाचा उल्लेख होईल तेव्हा मनमोहन सिंग यांच्या नावाचा नक्कीच उल्लेख केला जाईल. एकदा ते व्हीलचेअरवरुन आले होते. त्यांनी व्हीलचेअरवरुन येऊन एकदा मतदान केलं होतं. ते लोकशाहीला ताकद देण्यासाठी आले होते. मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत रहावे, अशी इच्छा व्यक्त करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विशेष म्हणजे कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.



काळा टिळा लावल्याबद्दल काँग्रेसचे आभार


काँग्रेसकडून भाजपाच्या 10 वर्षाच्या कार्यकाळातील कामगिरीवर ब्लॅक पेपर सादर केला जाणार आहे. यावरुनही पंतप्रधानांनी टोला लगावला. काळ्या टिळा लावल्यास प्रगतीला नजर लागत नाही. आज हा काळा टिळा लावण्याचा प्रयत्न झाला, असं मोदी म्हणाले. "काळ्या कपड्यांमधील फॅशन शो पाहण्याची संधीही सभागृहाला मिळाली. काही वेळेस काही कामं इतकी चांगली होतात की ती दिर्घकाळ उपयोगी ठरतात. आमच्याकडे काही चांगलं काम झाल्यानंतर कुटुंबातील एखादा सदस्य असंही म्हणतो की, नजर लागेल थांब काळा टिळा लावतो. मागील 10 वर्षांमध्ये जे काम झालं त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आज खरगेंनी काळा टिळा लावला आहे. आमच्या कामांना नजर लागू नये म्हणून तुमच्यासारख्या ज्येष्ठ खासदाराने असा काळा टिळा लावणं ही फार चांगली गोष्ट आहे," असं मोदी म्हणाले.