`हिंमत असेल तर...`; नागरिकत्व कायद्यावरुन मोदींचं काँग्रेसला आव्हान
नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार
साहेबगंज : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज झारखंडमधील प्रचारसभेत जोरदार पलटवार केला. देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस अफवा पसरवतंय, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. हिंमत असेल तर काँग्रेसनं पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल, अशी घोषणा करावी, असं आव्हानही मोदींनी दिलं.
आम्ही जो कायदा बनवला आहे तो बाजूच्या तिन्ही देशात धार्मिक अत्याचारामुळे भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधून अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करु, तीन तलाकविरुद्ध बनवलेला कायदाही रद्द करु, अशी घोषणाही करावी, असं मोदी म्हणाले.
काँग्रेसने देशाशी खोटं बोलणं, भ्रम पसरवणं आणि दुसऱ्यांना आपली ढाल बनवणं सोडून दिलं पाहिजे. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी देशाच्या युवकांना बर्बाद करण्याचा खेळ बंद केला पाहिजे, अशी टीकाही मोदींनी केली.
आदिवासी आणि दलितांना घाबरवण्याचं काम आजही काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडीची लोकं करत आहेत. काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या नितीमुळे एकदा देशाची फाळणी झाली आहे. भारताचे आधी तुकडे पाडले गेले. काँग्रेसने अवैधरित्या लाखो घुसखोरांना भारतात घुसून दिलं. आता त्यांचा व्होटबँकेच्या नावावर वापर होत आहे, असा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधानांनी या सभेत बोलताना विद्यार्थ्यांनाही आवाहन केलं. तुम्ही जिकडे शिकत आहात, त्याचं महत्त्व ओळखा. सरकारच्या निर्णयांवर आणि नितीवर चर्चा करा, वादविवाद करा. जर तुम्हाला काही चूक वाटत असेल, तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करा आणि आपला मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवा. सरकार तुमची प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक भावना ऐकते आणि समजते, असं वक्तव्य मोदींनी केलं.