मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका
मोदींनी ट्विटरववर एक व्हिडिओ शेअर केला आहे
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेन्नईतील भेटीदरम्यान दोघेही महाबलीपुरम या शहरात थांबले. आज शी जिनपिंग यांचा भारतातील दुसरा दिवस आहे. शनिवारी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताना, किनाऱ्यावरील प्लॅस्टिक आणि कचरा उचलतानाचा एक व्हिडिओ मोदींनी शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी व्हिडिओवर चांगलीच टीका केली आहे.
प्लॅस्टिक कचरा उचलताना मोदी प्लॅस्टिकच्या पिशवीतच हा कचरा भरत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आता यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.
मोदींच्या या स्वच्छता अभिनयानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. परंतु अनेकांनी या व्हिडिओवर मोदी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.
२९ सप्टेंबर रोजी झालेल्या मोदींच्या 'मन की बात'मध्ये त्यांनी, २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून single use plastic पासून मुक्त होण्याचा संकल्प करत असल्याचं सांगितलं. त्यानुसार २ ऑक्टोबरपासून देशभरात एकदाच वापरण्याजोग्या येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली.
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे आता मोदींनी प्लॅस्टिक वापरल्यानंतर नेमका दंड कोणाला करायचा? हा सवाल नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.