नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज साऊथ ब्लॉक येथे केंद्री कॅबिनेटची अखेरची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. यानंतर पंतप्रधान मंत्रिपरिषदेच्या बैठकीत सहभागी होतील. 16 वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात येईल. हा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवण्यात येईल. 16 वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतील. राष्ट्रपची हा प्रस्ताव स्वीकारत लोकसभा बरखास्त करण्याचे आदेश देतील. अशी प्रक्रिया असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार उद्या 25 मे ला भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. यासाठी पार्टीने सर्व विजयी खासदारांना दिल्ली पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. खासदारांच्या बैठकीसाठी संसदेच्या सेंट्रल हॉल उद्या आणि परवा म्हणजेच 25 आणि 26 मेला बुक करण्यात आला आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी हे संसदीय दलाचा नेता निवडण्याची औपचारिकता करतील. संसदीय दलाचा नेता घोषित करण्याचे पत्र पंतप्रधान मोदी यांना सोपवले जाईल. एनडीएच्या मित्र पक्षांना पत्र दिले जाईल. 


हे पत्र घेऊन पंतप्रधान मोदी ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एनडीएतील मोठे नेते देखील यावेळी सोबत असतील. इथे राष्ट्रपतींकडे पत्र सोपवून सरकार बनवण्याचा दावा सादर केला जाईल. संविधानानुसार बहुमत असलेल्या नेत्याला राष्ट्रपती सरकार बनवण्याचे निमंत्रण देतात. यानंतर शपथविधी प्रक्रिया सुरू होईल. तारीख आणि जागा ठरल्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शपथग्रहणविधी याच महिन्यात होईल असे सांगितले जात आहे. 



याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी यांचा वाराणसीत जाण्याचा देखील कार्यक्रम आहे. ते वाराणसीच्या जनतेचे आभार मानतील. 28 मेला ते आपल्या संसदीय क्षेत्र वाराणसीत जातील असे म्हटले जात आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये देखील भाजपा सरकार शपथ घेईल. हा शपथ ग्रहण विधी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी नंतर होईल.