`भारताचे इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेच नसीरुद्दीन शहा, कमल हसन सदस्य`
केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि कमल हसन हे इस्लामीकरणाच्या मोहिमेचे सदस्य असल्याचे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले. भारतामध्ये इस्लामीकरण करण्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आधीपासूनच सुरू आहे. आता पुलवामा हल्ल्यानंतर त्याला बळच मिळाले असल्याचे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
गिरीराज सिंह हे कायमच वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधीही त्यांनी अशीच विधान केली होती. दारुल उलुम देवबंद म्हणजे दहशतवादी तयार करण्याचा कारखानाच आहे, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी करण्यापासून जगातील कोणीही रोखू शकणार नाही, असेही वक्तव्य त्यांनी याआधी केले होते.
दरम्यान, पुलवामातील भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले मत मांडले आहे. कोणताही पुरावा हातात नसताना भारताकडून पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला बदनाम करण्यात येत आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानमधील कोणाचा हात असल्याचे पुरावे दिले गेले, तर आपण त्याची चौकशी करू आणि सत्य परिस्थिती उघड करू, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी त्या देशावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी हे विधान केले आहे.