आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या स्मार्टफोनमध्ये अश्लील डेटा
तांत्रिक कारण देत सर्व महिलांना दिलेले हँडसेट परत घेण्यात आले आहेत.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नव्या कोऱ्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफिती आणि छायाचित्र आढळून आली आहेत. नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला आहे. तांत्रिक कारण देत सर्व महिलांना दिलेले हँडसेट परत घेण्यात आले आहेत.
नवीन मोबाईल जेव्हा दिेले तेव्हा आधीच अनेक एप डाऊनलोड केले होते. तर मग नवे फोन दिले नव्हते का ? कुणीतरी वापरलेले फोन दिले होते का ? असे प्रश्न कॉंग्रेसच्या गटनेत्या हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे. वापरलेलेच फोन पुन्हा पुन्हा पुरवून नवे फोन दिले जात आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच या संतापजनक प्रकाराची तक्रार करण्यास महिला गेल्या पण तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात केल्या जाणाऱ्या लसिकरणाची नोंद ठेवण्यासाठी हे मोबाईल देण्यात आले. एकूण 40 महिला या अंतर्गत प्रशिक्षण घेत होत्या. राज्य सरकारचा आरोग्य विभाग यासंदर्भातील प्रशिक्षण देत असतो. हे मोबाईल आधी वापरले होते असे दिसून आले.
साधारण 30 मोबाईलमध्ये या चित्रफित असल्याचे समोर आले पण आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केवळ सहा ते सात मोबाईलमध्येच हा डेटा आढळून आला आहे. यासंदर्भात महिलांच्या तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यानंतर इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केल्यावर ती दाखल करून घेण्यात आली. या संदर्भात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.