देशभरात Corona रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ
आकडा पोहोचला.....
नवी दिल्ली : देशभरात coronavirus कोरोना व्हायरसचा अतिशय झपाट्यानं वाढणारं प्रमाण प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं अनेक आव्हानं उभी करत आहे. अनेक प्रयत्नांनंतरही देशात सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी सुद्धा याच वेगानं पुढे गेल्याचं पाहायला मिळालं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्याही पार गेला आहे. १५ लाख ३१ हजार इतक्या रुग्णसंख्येसह देशात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा ३४,१९३ वर पोहोचला आहे.
मागील चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७६८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तर सद्यस्थितीला देशात तब्बल ५,०९,४४७ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. समाधानकारक बाब म्हणजे आतापर्य़ंत ९,८८,०३० रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या आकड्यामध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं आता मोठ्या फरकानं कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल, यासाठीच केंद्र आणि राज्य प्रशासनांकडून खबरदारीची विविध पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांमध्ये रिकव्हरी रेट ६४.५० टक्के इतका झाला आहे.
जगभरात सुरु असणारं कोरोनाचं थैमान पाहचा रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता भारत कोरोना प्रभावित राष्ट्रांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर ब्राझील आणि पहिल्या स्थानावर अमेरिका असल्याची माहिती समोर येत आहे.