जर तुम्हाला मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट बघायचा असेल तर किमान 200 ते 300 रुपये प्रति तिकिट खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा विचार केला तर तुम्हाला 800 ते 1200 रुपये खर्च करावे लागतात.मात्र आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी फक्त 75 रुपये मोजावे लागणार आहेत. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MAI) निर्णयानंतर आता चित्रपट गृहात 75 रुपयांत चित्रपट पाहता येणार आहे. देशभरातील सर्व सिनेमा गृहामध्ये 16 सप्टेंबरला फक्त 75 रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटाचे तिकिट मिळणार आहे.


अमेरिकेमध्ये 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त, तिकीटाची किंमत फक्त 3 डॉलर पर्यंत कमी करण्यात आली आहे. अमेरिकेमधील तिकिटांची किंमत साधारणतः नऊ डॉलर असते. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशभरात 75 रुपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.


PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage and City Pride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight यासह देशभरात सुमारे 4,000 स्क्रीन्स आहेत. जिथे 16 सप्टेंबरला चित्रपटाची तिकिटे 75 रुपयांना विकली जाणार आहेत.


मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटाद्वारे एकत्र आणेल. चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याचा उत्सव आणि प्रेक्षकांचे आभार मानण्याचा हा एक प्रकार आहे. जे अद्याप आपल्या जवळच्या चित्रपटगृहात परतले नाहीत अशा सर्वांना चित्रपट पाहण्याचे आमंत्रण आहे.


दरम्यान, गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बराच काळ बंद होती. थिएटर मालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट ट्रेण्डमुळेही बॉलिवूडपटांना उतरती कळा लागली आहे. मात्र आता या निर्णयानंतर थिएटर मालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.