देशातील कोरोना संक्रमणाविषयीची मोठी बातमी
ऑगस्टनंतर प्रथमच...
नवी दिल्ली : जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही भारतावर असणारं coronavirus कोरोनाचं संकट काही टळलेलं नाही. किंबहुना संपूर्ण जगात, अद्यापही कोरोनाचा कहर सुरुच आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्येनं 71.75 लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, या व्हायरसवर मात करत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 62 लाखांवर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले. ज्यामुळं एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,75,880 इतकी झाली आहे. एका दिवसात आढळलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा बऱ्याच दिवसांनंतर इतका कमी असल्याचं आढळलं आहे.
जवळपास 18 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 55 हजारांच्या घरात रुग्ण आढळले आहेत. 18 ऑगस्ट्ला यापूर्वी 55,079 इकते रुग्ण दिवसभरात आढळले होते. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये कोरोनामुळं दगावलेल्या रुग्णांची संख्या 706 इतकी असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत देशात कोरोनानं 1,09,856 जणांचा बळी घेतला आहे. देशामध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मागीत चोवीस तासांमध्येही जास्त असल्याचं पाहायाला मिळालं. जवळपास 77,760 रुग्णांनी चोवीस तासांत कोरोनावर मात केली.
कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये देशातील तब्बल 62,27,295 रुग्णांचा समावेश आहे. तर, सध्याच्या घडीला कोरोनासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 8,38,729 इतकी आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 86.78 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर, मृत्यूदर 1.53 वर कायम आहे.