प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सेना नगरसेवकाला अटक
शिवसेना नगरसेवक राजू कांबळे याला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांची अटक
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली विभागातील शिवसेना नगरसेवक राजू कांबळे याला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. ऐरोली मधील मनसे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांच्यावर नगरसेवक राजू कांबळे आणि त्याचा भाऊ संतोष दळवी यांनी डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ दळवी यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राणघातक हल्ला
ऐरोली गावात नगरसेवक राजू कांबळे यांच्या वॉर्डात गटाराचे काम सुरू होते. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आक्षेप विश्वनाथ दळवी यांनी घेतला होता. आपल्या कामात आढवा येणाऱ्या विश्वनाथ याच्यावर नगरसेवकाने हल्ला केला. त्याचबरोबर त्यांच्या परिवारालाही धक्काबुक्की करण्यात आली. नगरसेवक राजू कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला करणे, विनयभंग करणे आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून रबाळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.