मुंबई : कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.



सिद्धूंना 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेर काढण्याच्या मागणीनंतर 'द कपिल शर्मा शो'ची टीम, सोनी टीव्ही टीम एकत्रितपणे यावर चर्चा करत होते. अतिशय संवेदनशील घटनेवर नवज्योत सिंग सिद्धूंनी दिलेले हे विधान चुकीचे असल्याचे टीमच्या सदस्यांनी, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी यावर एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार त्यांच्यासोबत पुढील एपिसोडचे शूट करण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे.