मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ५ वर्ष स्थिर सरकार देणार असा विश्वास व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलंय. मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेचा जन्म झाला, असं वक्तव्य केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपकडे बहुमत नाही, हे निश्चित झालं होतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे घोडेबाजाराचा भाजपचा प्रयत्न फसला. याचा अंदाज आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ७८ तासांत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा विजय आहे. लोकशाहीमध्ये आम्हीच राहू... कुठलेही नियम - कायदे पाळणार नाही... कुठल्याही पद्धतीनं सत्तेत राहू... हे महाराष्ट्रात चालणार नाही,  असंही यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं.


'उद्धव ठाकरेच आमचे नेते...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तीनही पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनी हे स्पष्ट केलंय की महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हेच असतील. पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच असतील. उद्धवजीही यावेळी बैठकीला उपस्थित होते. त्यांनीही याला होकार दिला आहे. नेता निवडीनंतर उद्धव ठाकरे राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा दाखल करतील' असंही त्यांनी म्हटलं. 


एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आली आहे. विरोधकांना सांगू इच्छितो, की मराठी माणसांच्या हितासाठीच शिवसेनेचा जन्म झालाय. भाजपच्यासोबत राहून शिवसेना बिघडली होती. परंतु, आता शिवसेना महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी काम करेल आणि हे सरकार निश्चितच पाच वर्ष टिकेल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.



'भाजपच्या अंताची सुरुवात...'


भाजपच्या अंताची सुरुवात झाली आहे... यालाच महाराष्ट्रानं एक दिशा दिली आहे. भाजप पक्ष आणि त्यांचे नेते अहंकारी झाले होते, आज महाराष्ट्रानं त्यांचा अहंकार धुळीस मिळवला आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला हाणलाय.


देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यातलं सर्वात अल्पायुषी सरकार ठरलंय. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. देवेंद्र फडणवीस फक्त ७८ तास मुख्यमंत्री राहिले. बहुमत नसल्यानं राजीनामा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सकाळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर संख्याबळ नसल्याचं मान्य करत फडणवीसांनीही राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. प्रभावी विरोधी पक्षाचं काम करु, असं फडणवीसांनी सांगितलं.