दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: आजी माजी आणि भावी या विधानावरून संजय राऊत यांनी दिलेल्या रोखठोक मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आधीच महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरू आहेत. त्यामध्ये आता शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि संजय राऊत आमनेसामने येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात जुन्या काळात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल आस्था होती. तेव्हा कोथळा काढण्याची भाषा कुणी करत नव्हतं. असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. मुंबईतील गोरेगाव इथे मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.


शदर पवार म्हणाले की, ''मृणाल गोरे विरोधीपक्षनेत्या होत्या, अनेक गोष्टींवरून सभागृहात त्या खूप बोलायच्या. सभागृहात एकमेकांवर प्रचंड हल्ले व्हायचे, पण सभागृहाचे कामकाज संपल्यावर तो संघर्ष विसरून सगळे जण एकत्र बसायचे आणि राज्याच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा करायची, तिथे वाद नसायचा, सुसंवाद असायचा. हा समजूतपणा त्या काळात सातत्याने आम्हाला पहायला मिळायचा. परस्परांबद्दल आस्था असायची, त्यावेळी कोथळा काढू अशी भाषा कुणी काढली नाही.'' 


नेमकं काय होतं ते विधान?


आम्ही समोरून कोथळा काढतो मागून खंजिर खुपसत नाही. असं एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावर स्पष्टीकरण देतानाही संजय राऊत म्हणाले होते की पाठीत खंजिर खुपसण्याची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. कोणावर खटला दाखल करता ते पाहावं लागेल. शिवचरित्र सांगून कोथळा काढणे म्हणजे काय याचा अर्थ सांगू. आम्ही शिवरायांचे मावळे आहेत. त्यामुळे पाठीमागून वार करत नाही. समोरून वार केला की कोथळा निघणार ना? असंही राऊत म्हणाले होते.