मल्याळम अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी केरळमधून निवडणूक जिंकत भाजपाला राज्यातील पहिला खासदार मिळवून दिला आहे. यासह भाजपाने केरळात इतिहास रचला आहे. यामुळे नरेंद्र मोदी सरकारने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. दरम्यान सुरेश गोपी यांच्या एका विधानामुळे ते केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण आता मात्र त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. 


सुरेश गोपी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरवत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहोत, ”अशी पोस्ट सुरेश गोपी यांनी शेअर केली आहे. 


दरम्यान याआधी सुरेश गोपी यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता राज्यमंत्रीपद देण्याबाबत विचारलं असता त्यांनी नाराज असल्याचं म्हटलं होतं. "खासदार म्हणून काम करणं हेच माझं उद्दिष्ट आहे. मी काहीही मागितलेलं नाही. मला या पदाची गरज नाही असं मी म्हटलं होतं. मला वाटतं की, मला लवकरच या पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहित आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखरच चांगलं काम करेन. मला माझे चित्रपट कोणत्याही किंमतीत पूर्ण करायचे आहेत,” असं सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.



सुरेश गोपी यांच्या विधानानंतर ते मंत्रिमंडळातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी भाजपाचे केरळ अध्यक्ष के सुरेंद्रन यांनीही त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला. “पंतप्रधानांनी त्यांना मंत्री केले आहे. या बाबी माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. कृपया या प्रश्नांनी मला त्रास देऊ नका,” असं ते म्हणाले होते. 


या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितलं आहे की, सुरेश गोपी यांनी रविवारी शपथविधीपूर्वी देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील होण्यास उत्सुक नसल्याचं सांगितलं होतं. रविवारी सकाळी ते तिरुवनंतपुरमला गेले होते. पण नंतर ते आपल्या पत्नीसह दिल्लीला परतले आणि पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


सुरेश गोपी यांनी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आणि केरळमधील भाजपाचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचला आहे. सुरेश गोपी यांनी तिरंगी लढतीत सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसने के मुरलीधरन यांना त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सुरेश गोपी यांनी ‘त्रिशूरसाठी केंद्रीय मंत्री, मोदींची हमी’ अशा घोषणा देऊन आपल्या उमेदवारीचा जोरदार प्रचार केला.