नवी दिल्ली : जेईई (मुख्य)  परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत. आता नीट अंडर ग्रॅज्युएट-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात एनटीएने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांना कोरोना काळात प्राधान्याने त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रांचा पर्याय निवडावा लागला. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या आधारे परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. 


परीक्षांची अधिकृत माहिती देताना एनटीएने सांगतिलं की, जेईई आणि नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. जेईई परीक्षा केंद्राची संख्या 570हून अधिक वाढवून ती 600 करण्यात आली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी क्रेंद्रांची संख्या 2546 वरुन 3843 करण्यात आली आहे.


जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई ऍडव्हान्सची परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. याआधी जेईई परीक्षा 18 जुलै ते 23 जुलै आणि नीटची परीक्षा 26 जुलै रोजी होणार होती. 


नीट आणि जेईई या स्पर्धा परीक्षांमध्ये 27 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. आपल्या जवळच्याच केंद्रात परीक्षा देण्याची सुविधा केल्यामुळे, कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी इतर शहरांमध्ये जावं लागणार नाही. 


केंद्रीय शिक्षण मंत्रालयानुसार, परीक्षा केंद्र निवडण्याच्या पर्यायामुळे, विद्यार्थ्यांना कोरोना काळात जास्त प्रवास करावा लागणार नाही. त्यांच्या सोयीनुसार ते परीक्षा केंद्र निवडू शकतील म्हणून त्यांना त्यांच्या आवडीचं केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला.