किर्लोस्करांची लेक होणार टाटांच्या घरची सून
देशातील आणखी २ उद्योगपती होणार सोयरे
मुंबई : भारतातील काही प्रमुख उद्योगपतींपैकी एक असणारे टाटा आणि किर्लोस्कर यांच्यात आता नवं नातं जुळतं आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा पुत्र नेविल आणि विक्रम किर्लोस्कर यांची कन्या मानसी यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. लवकरच नेविल आणि मानसी विवाहबंधनात अडकणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशात अंबानी आणि पीरामल कुटुंबांमध्ये नवं नातं जुळलं होतं. त्यानंतर आता टाटा आणि किर्लोस्कर एकमेकांचे सोयरे होणार आहेत. बंगळुरु येथे नेविल यांनी किर्लोस्कर यांच्या घरी जाऊन मानसीसाठी लग्नाची मागणी घातली. त्यानंतर मुंबईत टाटा कुटुंबियांच्या घरी साखरपुडा पार पडला. याच वर्षी दोघांचा विवाह होण्याची शक्यता आहे. अशी माहिती इकोनॉमिक्स टाईम्सने दिली आहे.
नोएल टाटा ट्रेंटचे चेअरमन आहेत तसेच ते टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माध्यमांपासून दोन हात लांब राहणं त्यांना आवडतं. नोएल टाटा यांना नेविल हा एक मुलगा तर लेह आणि माया या दोन मुली आहेत. तर विक्रम किर्लोस्कर हे टोयाटो किर्लोस्कर मोटरचे व्हाईस चेअरमन आहेत. मानसी किर्लोस्कर ही सिस्टम विभागात कार्यकारी संचालक आहे.