Corona variant | भारतात अलर्ट घोषित! डेल्टापेक्षाही खतरनाक व्हेरिएंट देशात
कोरोनामुळे संपूर्ण जग काही काळासाठी थांबलं होतं. भारतात देखील वाढत्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी दीर्घकाळासाठी लॉकडाऊन लावला गेला होता.
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जग काही काळासाठी थांबलं होतं. भारतात देखील वाढत्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी दीर्घकाळासाठी लॉकडाऊन लावला गेला होता. त्यानंतर लसीकरणाचा जोर वाढवल्यानंतर भारतात सगळं काही ठिक होत आलं होतं. जवळपास दीड वर्षानंतर अनलॉक झालेलं असतानाच आता नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगाची झोप उडाली आहे. कारण हा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हायरसपेक्षा ही अधिक घातक असल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे लोकं खूप घाबरले आहेत.
याबद्दल असं सांगितलं जातंय की, कोरोना लसीकरण झालेल्यांनाही या नव्या व्हेरिएंटची लागण होऊ शकते. जे खरोखरचं काळजीची बाब आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने हा नवा व्हायरस पसरत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शनिवारी आग्नेय आशिया खंडातील देशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नवीन प्रकार आढळून आल्याने आणि अनेक ठिकाणी संसर्गाची प्रकरणे वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता वाढविण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करण्यास सांगितले आहे. सण आणि उत्सवांमध्ये सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.