मुंबई : केबल सेवेबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. पण या तक्रारींकडे केबल ऑपरेटर किंवा डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या गंभीरपणे बघत नाहीत. त्यामुळे अनेकदा यामुळे केबल ऑपरेटर आणि ग्राहकांमध्ये वाद होतात. ग्राहकांना अशा कटकटीतून मुक्त करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) नवे नियम लागू केले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून टीव्ही जगतात अनेक बदल होणार आहेत. ग्राहकांना आता आपल्या मर्जीनुसार हवे असलेले चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या नव्या नियमामुळे मिळणार आहे. या आधी ग्राहकांना गरजेचे नसताना देखील काही प्रादेशिक वाहिन्यांचे पॅकेज त्यांच्या माथी मारले जायचे. त्यामुळे ग्राहकांना त्या चॅनेलचे अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे. पण आता या नव्या नियमांनुसार ग्राहक खऱ्या अर्थाने राजा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायने याबाबतीत एक ट्विट केले आहे. जर डीटीएच कनेक्शनमध्ये (केबलसेवा) तीन दिवसांपासून खंड पडला असेल तर,  ग्राहकांना यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. ट्रायने केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, ७२ तासांपासून जर सेवा खंडीत झाली असेल तर ग्राहकांनी यासंदर्भात फोन करुन तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतरच्या पुढील तीन दिवसांत सेवा सुरु न झाल्यास जितके दिवस केबल सेवा खंडीत झाली असेल तेवढ्या दिवसांचे पैसे द्यावे लागणार नाहीत.


 



तसेच ट्रायच्या या नव्या निर्णायामुळे यापुढे आता कोणतेही चॅनेल फ्री नसणार आहे. जर तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर किमान १५३ रुपयांचा (करांसोबत) तर साधारण १३० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज केल्यानंतर १०० फ्री टू एअर चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. पण यात ग्राहकाच्या आवडीचे चॅनेल असतीलच असे नाही.


अनेकदा ग्राहक केबलसेवा खंडीत झाल्यानंतर तक्रार करतात. पण या तक्रारीला उत्तर देताना, करु, बघू  अशा प्रकाराची उडवाउडवीची उत्तर दिली जातात. त्यामुळे या नव्या नियमामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. ट्रायच्या या नव्या नियमांची अंमलबजावणी ही १ फेब्रुवारीपासून केली जीणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या संबंधित केबल ऑपरेटर सोबत संपर्क साधून आपल्या पॅकची निवड करायची आहे. यात दोन पॅकचे पर्याय देण्यात आले आहे. यात एक १५३ रुपयांचा तर दुसरा पॅक हा १३० रुपयांचा असणार आहे.


अधिक वाचा 'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा