मुंबई : उत्तर प्रदेशमधून एका नवजात बालकाला मुंग्या चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेत बेडवर मुंग्या असल्याची तक्रारही केली होती. मात्र हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने निष्पाप नवजात बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता महिला जिल्हा हॉस्पिटलचे डॉ. डी.के. सुल्लेरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलपहार तालूक्याच्या मुधारी गावात राहणाऱ्या सुरेंद्र राईकवार यांची पत्नी सीमा गर्भवती होती. हे दाम्पत्य महिला जिल्हा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आले होते. डॉक्टरांकडून यशस्वीरीत्या प्रसूती करण्यात आली. यामध्ये महिलेने एका मुलाला जन्म दिला.  या नवजात बाळाला विशेष निओनेटल केअर युनिट वॉर्डच्या बेडवर ठेवले होते. 


नवजात बाळाचा झाला मृत्यू 


नवजात बाळाच्या प्रकृती नाजूक असल्याने त्याला विशेष निओनेटल केअर युनिटच्या बेडवर ठेवले होते. या बेडवर मुंग्या असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. सलग तीन दिवस त्याला त्याचं बेडवर ठेवण्यात आले होते. आधीच प्रकृती नाजूक असल्याने मुंग्या चावून चावून त्याचा मृत्यू झाला. 


नातेवाईकांचा आरोप 


नवजात अर्भकाच्या पलंगावर असलेल्या मुंग्यांनी त्याचा इतका चावा घेतला की त्याला त्रास होऊ लागला.त्यामुळे नवजात बालकाची प्रकृती ढासळू लागली. निष्पापांच्या शरीरावर मुंग्यांच्या चाव्याच्या खुणाही आहेत, तर वॉर्डातही मुंग्या दिसतात. तीन दिवसांच्या निष्पाप नवजात अर्भकाला मुंग्यांनी अशा प्रकारे खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  


लाच घेतल्याचा गंभीर आरोप
दरम्यान याआधीही मुलाच्या अंथरुणावर मुंग्या आल्याची तक्रार ड्युटीवरील डॉक्टर आणि स्टाफ नर्सकडे करण्यात आली होती, मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे कुटुंबीयाचा आरोप आहे. यासोबतच रूग्णालयात तैनात असलेल्या डॉक्टरवर 6 हजार 500 रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला आहे.


चौकशीचे आदेश
दरम्यान निष्पाप बाळाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरल असून याप्रकरणी कारवाईची मागणी जोर धरतेय. या प्रकरणात आता महिला जिल्हा हॉस्पिटलचे डॉ. डी.के. सुल्लेरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.