नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएला (राष्ट्रीय तपास संस्था) हल्ला झालेल्या घटनास्थळावरून काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली ईको कार २०१०-११ मधील मॉडेल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कारचा हल्ल्यात वापर करण्यासाठी कारला पुन्हा रंग देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. पुलवामा आत्मघाती हल्ला घडवणारा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल दारच्या कुटुंबातील सदस्यांचा डीएनए नमुना एनआयएकडून घेण्यात येणार आहे. या नमुन्यांच्याआधारे घटनास्थळावरून मिळालेल्या रक्ताच्या नमुन्यांशी चाचणी केली जाणार आहे. एनआयएला या हल्ल्यावेळी कारमध्ये आदिल एकटाच होता की आणखी कोणी त्याच्यासोबत कारमध्ये होते याबाबत माहिती मिळू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयए टीम या हल्ल्याचा तपास करत आहे. पुलवामा हल्ल्याच्या घटनास्थळी पोहचलेल्या एनआयए टीमला काही महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. एनआयए टीमला हल्ल्याच्या घटनास्थळी एक कॅन मिळाला आहे. या कॅनमध्ये ३० किलोग्रॅम आरडीएक्स ठेवला असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या ईको कारचे शॉक ऑब्जर्वर मिळाले आहेत. शॉक ऑब्जर्वरवरून ही कार कोणत्या सालातील आहे, गाडीचा मालक कोण आहे याबाबत माहिती मिळू शकते.   



१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आत्मघाती हल्ला घडवून आणला. जम्मूहून श्रीनगर जाणाऱ्या सीआरपीएफ ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर झालेल्या स्फोटात ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात असून एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) याप्रकरणी अधिक तपास करत आहे.