पाटणा: देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका विवाह सोहळ्यांना बसला आहे. सुरुवातीच्या काळात लग्नासाठी ५० लोकांना एकत्र येण्याची परवानगी होती. मात्र, आता कोरोनाचा वाढता फैलाव पाहता यावरही जवळपास निर्बंध आले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, बिहारमधील लोकांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर उपाय शोधून काढला. पाटणा येथे सोमवरी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निकाह पार पडला. यावेळी वर आणि वधूकडील मंडळी आपापल्या घरात होती. मोबाईलच्या स्क्रीनवर एकमेकांना पाहून निकाहचे विधी पार पडले. यानंतर घरात जमलेल्या मंडळींनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


देशभरात करोना विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत असून आतापर्यंत एकूण ५२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या आजाराने देशभरात १० जणांचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: 'लॉकडाऊन' करण्यात आले आहेत. यामध्ये  ५४८ जिल्ह्यांचा समावेश आहे.