लखनऊ: उत्तर प्रदेशमधल्या फारुखाबादमध्ये घडलेल्या ओलीस नाट्याचा अखेर शेवट झाला. एका माथेफिरूने २५ मुलांना घरात ओलीस ठेवले होते. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने या मुलांना आणि काही महिलांना त्याने घरी बोलावले आणि नंतर त्यांना तळघरात बंदी करून ठेवले. सुभाष बाथम असे या आरोपीचे नाव होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मुलांना या माथेफिरूच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आणि मुलांची सुटका करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर एनएसजी कमांडोंसह युपी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांच्या कारवाईत हा आरोपी ठार झाला. पोलिसांनी सर्व मुलांची आणि महिलांची सुखरुप सुटका झाल्याने अखेर निश्वास सोडला. 


तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली. 


सुभाष बाथम यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मी तुरुंगात असताना गावातील काही लोकांनी माझ्या पत्नीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी त्या आरोपींना समोर आणावे, अशी त्याची मागणी होती. तसेच, सरकारी योजनेतून त्याला घर आणि शौचालय बनवून हवे होते. मात्र, त्यावर कुठलीच कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे बाथमने टोकाचे पाऊल उचलले.