मुंबई : भारतात पुन्हा एकदा निपाह व्हायरस दाखल झाला आहे. केरळच्या कोच्ची शहरात २३ वर्षाच्या एका मुलाला निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील राष्‍ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान येथे मुलाच्या रक्ताचे नमुन पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी म्हटलं की, ''मंगळवारी या मुलाचा रिपोर्ट आला. त्याला एका खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था आणि मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि केरळमधील इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीज येथे रक्ताची तपासणी करण्यात आली. एकूण 86 रुग्णांपैकी २ जणांना या व्हायरसची लागण झाल्याची शक्यता आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या २ नर्स यांना देखील ताप आणि घशाला खवखवतं आहे.'


केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं की, 'केंद्र सरकार केरळला हवी ती मदत करेल. आम्ही वन्यजीव विभागाच्या संपर्कात आहोत. वटवाघुळांची टेस्ट करण्यासाठी त्यांची मदत करत आहोत. आम्हाला आशा आहे की. येथे काही दुखद नाही होणार. मी आरोग्य सचिव आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी ६ जणांची टीम पाठवण्यात आली आहे.


मागच्या वर्षी केरळमध्ये निपाह व्हायरसने हैदोस घातला होता. या व्हायरसमुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता.


तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस वटवाघुळांमुळे पसरतो. वटवाघुळ एखादं फळ खातो. तेच फळ जर दुसऱ्या कोणी प्राण्याने किंवा माणसाने खालं तर त्याला हा आजार होऊ शकतो. सुरुवातीला डोकेदुखी आणि ताप हे याचं लक्षण आहे. यामध्ये माणसाच्या मृत्यूची शक्यता ७४.५ टक्के आहे.