VIDEO: नीरव मोदी दाढीमिशा वाढवून लंडनमध्ये फिरताना सापडला
नीरव मोदीने लंडनमध्ये थाटला हिऱ्यांचा नवा व्यवसाय
लंडन: पंजाब नॅशनल बँकेत १३७०० कोटींचा गैरव्यवहार करून फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये खुलेआम फिरताना आढळून आला आहे. 'द टेलिग्राफ'ने नीरव मोदीची लंडनमधील रस्त्यांवर फिरतानाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहे. नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसायही सुरु केल्याचेही समजते. त्यामुळे आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि परराष्ट्र मंत्रालय काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मद्यसम्राट विजय मल्ल्या यानेही भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये आश्रय घेतला होता. नीरव मोदीनेही आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसत आहे.
लंडनच्या सेंटर पॉईंट टॉवर ब्लॉक या प्रसिद्ध इमारतीमध्ये नीरव मोदी वास्तव्याला आहे. याठिकाणी त्याचा तीन खोल्यांचा अलिशान फ्लॅट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फ्लॅटचे महिन्याचे भाडे साधारण १७००० युरो इतके आहे. तर बाजारभावानुसार या जागेची किंमत ८ कोटी युरो इतकी असल्याचे समजते.
नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरत असताना 'द टेलिग्राफ'चे पत्रकार माईक ब्राऊन यांनी त्याला गाठले. तुम्ही लंडनमध्ये राजकीय आश्रय मागितला आहे का, असा प्रश्नही माईक यांनी नीरवला विचारला. त्यावर नीरव मोदीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. लंडनमध्ये वावरताना आपला लूक बदलण्यासाठी दाढी-मिशा वाढवल्याचे दिसत आहे. हा व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी नीरव मोदीचा अलिबाग येथील बंगला नियंत्रित स्फोट करून पाडला होता. पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.