नीरव मोदीला दणका ! अलिबाग येथील भव्य बंगला होणार जमीनदोस्त
बंगला एवढा मोठा आहे की तो पाडण्यासाठी कमीत कमी 4 दिवसांचा वेळ लागणार आहे.
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा जोरदार झटका बसणार आहे. त्याचा अलिबाग येथील बंगला थोड्याच वेळात जमीनदोस्त होणार आहे. रायगडमध्ये काही वेळात या कारवाईला सुरूवात होणार आहे. नीरव मोदीचा जो बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे तो 20 हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरला आहे. बंगला एवढा मोठा आहे की तो पाडण्यासाठी कमीत कमी 4 दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. बंगला पाडण्यासाठी मोठ्या मशिन बंगल्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.
13 हजार कोटींचा घोटाळा
नीरव मोदी हा पीएनबीच्या 13 हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आहे. हा बंगला रायगड जिल्ह्यातील अलीबाग बीचजवळ बेकायदेशीररित्या बनवला गेला आहे. या बंगल्यामध्ये नीरव मोदीने खूप साऱ्या भव्य पार्टी दिल्या आहेत. तिथल्या कलेक्टर ऑफिसने हल्लीच मोठ्या तपासानंतर या बंगल्याला बेकायदेशीर ठरवले होते. बंगला जमीनदोस्त करण्यापूर्वी आतील किंमती वस्तू ईडीने बाहेर काढत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्या.
नीरव विरोधात ईडीने विशेष न्यायालयात याचिका दाखल करत त्याला आर्थिक घोटाळ्यात फरार आरोपी घोषित केले होते. त्यानंतर नीरवने या महिन्याच्या सुरूवातीला विशेष पीएमएलए न्यायालयात आपला जबाब नोंदवला. 'मी काही चुकीचे केले नाही' असे नीरवने आपल्या जबाबात म्हटले आहे. 'पीएनबी घोटाळा एक साधारण आर्थिक व्यवहार होता, तो काही बॅंक घोटाळा नव्हता', असेही तो पुढे म्हणाला. 'मी सुरक्षेच्या कारणामुळे भारतात येत नसल्याचे'ही पुढे त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.