नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. १ फेब्रुवारीला ही फाशी होणार आहे. त्यासाठी पवन नावाचा जल्लाद तिहार कारागृहात पोहोचलाय. पवनला जेल नंबर ३ दाखवण्यात आलाय. पवन जल्लाद सध्या फाशीसाठी मानसिक तयारी करत आहे. दोषींना फाशी देण्याआधी त्यांच्या वजनाच्या डमी म्हणजे पुतळ्यांनाही फाशी दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्याची तयारी सुरू असताना दोषींची मात्र फाशी टाळण्यासाठी धडपड सुरूच आहे. त्यासाठी कोर्टकचेऱ्या आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेतला जातोय. दोषींची फाशी १ फेब्रुवारीला निश्चित झालेली असताना दोषींनी पुन्हा एकदा दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात धाव घेतलीये. राष्ट्रपतींनी क्रमानं दयायाचिकांचा विचार करावा, अशी अजब मागणी दोषींच्या वकिलांनी न्यायालयात केली.


यावर कोर्टानं तिहार जेल प्रशासनाला नोटीस पाठवली असून शुक्रवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितलंय. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं अक्षय या दोषीची क्युरिटीव्ह पेटिशन फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे केवळ दया याचिकेचा पर्याय शिल्लक असला तरी त्याची मुदत आता संपल्याचा निर्भयाच्या वकिलांचा दावा आहे.


धक्कादायक बाब म्हणजे दोषींच्या वकिलांनी थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि राष्ट्रपतींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. एकूणच १ तारखेची फाशी हरतऱ्हेनं लांबवण्याचा दोषींचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसतंय. यावर निर्भयाच्या आई आशादेवी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.