नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत विशेष बाब म्हणजे, हा अर्थसंकल्प ब्रीफकेसऐवजी एका लाल कापडाच्या पिशवीतून संसदेत आणण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी अधिक चर्चा सुरु झाली. मात्र, बॅगे ऐवजी लाल कापडाची पिशवी का? याचे रहस्य खुद्द अर्थमंत्र्यांनीच उलगडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचे पहिले बजेट सादर करताना अर्थसंकल्प ब्रीफकेसऐवजी लाल कपड्याच्या बॅगमधून सादर केला. या बॅगेवर अशोक चिन्हही लावण्यात आले होते. या अर्थसंकल्पाला 'वही खाते' असे नाव देण्यात आले. 


अर्थमंत्री निर्मला यांनी लाल पिशवीचे रहस्य उलगडून सांगताना, ही लाल पिशवी त्यांना त्यांच्या मामीने बनवून दिली असल्याचे सांगतिले. निर्मला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, 'ब्रीफकेस तसेच सूटकेस मला आवडत नाही. ब्रीफकेस ब्रिटिशांच्या जमान्यापासून चालत आहे. मला ती गोस्ट आवडत नाही. माझ्या मामीने लाल रंगाची कापडाची पिवशी बनवली. त्याची पूजा करुन ती पिशवी मला दिली. ही लाल पिशवी घरातील आहे, असे वाटू नये म्हणून त्याला सरकारी ओळख देण्यासाठी त्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह लावले. 


'देशात प्रत्येक भागात विविध परंपरा आहेत. अनेकांची त्यावर श्रद्धा असते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करताना लाल रंगाच्या कापडाचा वापर करतात किंवा दुकानदारांच्या जमाखर्चाच्या चोपडीचा रंगही लाल असतो. लाल रंगात त्याला गुंडाळून त्याची पूजा केली जाते. लाल रंग शुभ समजला जातो. मी हाच विचार करुन अर्थसंकल्प या पिशवीत आणण्याचा निर्णय घेतला. ही पिशवी माझ्या मामीने स्वत:च्या हातांनी बनविली असल्याचेही' निर्मला यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या अर्थसंकल्पाची जी उत्सुकता होती, ती त्यांनी स्पष्ट केली.