लंडनमध्ये नीरव मोदी विरोधात वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला 14 हजार कोटी रूपयांचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला अटक करुन भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. नीरव मोदी विरोधात लंडनमधील एका न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे. त्यामुळे नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नीरव आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीच्या हस्तांतरणाची मागणी भारतातर्फे सातत्याने करण्यात येत होती. या मागणीला दाद देत लंडनच्या वेस्टमिनिस्टर दिवाणी न्यायालायाने नीरवविरोधात वॉरंट जारी केले आहे. स्थानिक पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता असल्याची माहिती संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिलीये. अटकेनंतर त्याला न्यायालयात सादर केलं जाईल आणि त्याला जामिनासाठी अर्ज करता येईल.
नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला दिली होती. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने नीरव मोदी इंग्लंडमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले होते. नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटन सरकारला विनंतीचे दोन अर्ज पाठवले होते. एक अर्ज सीबीआयच्या तर दुसरा अर्ज अंमलबजावणी संचलानलयाकडून करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून नीरव मोदी राहत असलेल्या अपार्टमेंटची किंमत जवळपास 60 करोड रूपये असून त्या घराचे भाडे महिन्याला 16 लाख रूपये इतके आहे. ब्रिटनच्या 'द टेलीग्राफ'ने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, 13,500 कोटी रूपयांची फसवणूक करणारा नीरव मोदी सेंटर पॉइंट टॉवर ब्लॉकच्या एका मजल्यावर तीन बेडरूमच्या घरात राहत असल्याचे सांगितले.