नवी दिल्ली: आमच्या पक्षातील काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायची गरज असल्याचे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते बुधवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जपून बोलायला हवे, असे सांगितले. यासाठी त्यांनी 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटाचे उदाहरण दिले. या चित्रपटात आपल्या मुलाची सतत खायची सवय मोडण्यासाठी पालक त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात, असे दृश्य आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांच्या तोंडातही असाच बोळा कोंबण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, हाच न्याय हनुमानाची जात आणि राहुल गांधी यांचे गोत्र काढणाऱ्यांनाही लावला जाईल का, असा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला. तेव्हा गडकरींनी आपण तोंडात बोळा कोंबावा, हे वक्तव्य मजेत केल्याचे म्हटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यंतरी हनुमान दलित जातीचा असल्याचे आणि राहुल गांधी यांच्या वंशावरून टिप्पणी केली होती. 


तसेच  राफेल प्रकरणावर भाजपाकडून देशभरात घेण्यात आलेल्या ७० पत्रकार परिषदांविषयी गडकरी यांनी खोचक टीका केली. आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 


राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. या अनुषंगाने गडकरी यांनी पक्षातील नेत्यांनी काही सल्ले दिले. राजकारण्यांनी प्रसारमाध्यमांशी कमीत कमी संबंध ठेवावा. भाजप नेत्यांना ही गोष्ट अधिकच लागू पडते, अशी पुस्तीही यावेळी गडकरींनी जोडली.