नितीन गडकरी भाजपमधील हिंमत असलेला एकमेव नेता- राहुल गांधी
२०१९ मध्ये मोदींना पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार सुरु आहे.
नवी दिल्ली: भाजप पक्षात फक्त नितीन गडकरी हेच एकमेव हिंमत असलेले नेते आहेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. गडकरी यांनी नुकत्याचे नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात 'ज्या व्यक्तीला आपलं घर सांभाळता येत नाही, तो देश काय सांभाळणार?', असे वक्तव्य केले होते. यावेळी गडकरी यांनी थेट कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, गडकरी यांच्या या विधानाचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून नितीन गडकरी यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, गडकरीजी मी तुमचे कौतुक करू इच्छितो. तुम्ही भाजपमधील एकमेव हिंमत असलेले नेते आहात. कृपया भविष्यात आणखी काही विषयांवर भाष्य करा, असे सांगत राहुल गांधी यांनी एक यादी दिली आहे. यामध्ये राफेल-अनिल अंबानी, शेतकऱ्यांची दुरावस्था, देशातील संस्थांच्या स्वायत्तेवर घाला, यांचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर रोजगारासंदर्भातही गडकरी यांनी भाष्य करावे, असे आणखी एक ट्विट राहुल यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात २०१९ मध्ये मोदींना पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या प्रत्येक वक्तव्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
यापूर्वी नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांची खमंग चर्चा झाली आहे. अशातच नागपुरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांसमोर गडकरी यांनी नवे वक्तव्य केले. ज्या व्यक्तीला आपलं घर सांभाळता येत नाही, तो देश काय सांभाळणार, असे गडकरींनी यावेळी म्हटले. कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. जर त्यांना हेच जमत नसेल तर, ते देशही सांभाळू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.