अमित शहांच्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांची तलवार म्यान
गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं.
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं. पण भाजपविरोधात नितीन पटेल यांनी केलेलं हे बंड आता थंड झालं आहे. नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांबरोबर फोनवर बोलणं झाल्यावर नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे. नितीन पटेल यांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करणार असल्याचं आश्वासन अमित शहांनी दिलं असल्याची माहिती आहे.
अमित शहांनी दिलेल्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांनी रविवारी गांधीनगरमध्ये जाऊन पदभार सांभाळायला सुरुवात केली आहे. मला कोणतंही महत्त्वपूर्ण मंत्रीपद नको पण आधीपासून माझ्याकडे जे मंत्रालय होतं तेच मला परत मिळावं, अशी माझी इच्छा होती, असं नितीन पटेल म्हणाले.
४० वर्षांपासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे. माझ्या योगदानामुळेच पक्षानं मला उपमुख्यमंत्री बनवलं असल्याची प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.
गुजरातचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पद सांभाळायला नकार दिला होता. खातेवाटपावरून मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्यामध्ये मतभेद सुरु असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ही आत्मसन्मानाची गोष्ट आहे आणि आपलं अमित शहांशी बोलणं झाल्याचं नितीन पटेल म्हणाले होते.