भागलपुर : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीश कुमार यांना सत्तेची प्रचंड हाव आहे, अशी टीका लालूंनी केली आहे. तर, बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री तेजस्वी यादवच असेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भागलपूरमधील सृजन घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी लालूंनी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत बोलताना लालूंनी नितीश कुमार आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. लालू म्हणाले, नितीश कुमार यांचे राजकारण सर्व काही खुर्चीसाठी अशा तत्वांचे आहे. सत्तेची प्रचंड हाव असल्यानेच त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. पण, बिहारची जनता सुज्ञ आहे. ही जनता आज ना उद्या तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री म्हणून स्विकारेनच असा विश्वासही लालूंनी यावेळी व्यक्त केला.


लालूंनी सांगितले की, भाजपची भीती मनात बाळगून नितीश यांनी महाआघाडी तोडली आणि त्यांनी एनडीएशी हातमिळवणी केली. पण, यापुढे कोणत्याही स्थितीमध्ये मी भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. नितीश भाजपला घाबरले पण, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही लढत राहू.