नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंवर लावण्यात आलेल्या करासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. ही गोष्ट फार काळ खपवून घेणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताकडून अमेरिकन वस्तूंवर कर लादला जाण्याचा जुना इतिहास आहे. मात्र, आता फार काळ ही गोष्ट खपवून घेणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच जपानमध्ये झालेल्या जी-२० परिषदेच्यावेळी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. त्या भेटीच्या अगोदरदेखील ट्रम्प यांनी अशाच आशयाचे ट्विट केले होते. भारताकडून अमेरिकन वस्तूंवर प्रतिगामी स्वरुपाचा आयात कर लादला आहे. ही गोष्ट खपवून घेण्यासारखी नसून हे कर तात्काळ रद्द झाले पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्ष भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली नव्हती. यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आयात कराच्या मुद्द्यावरून थयथयाट केला आहे.



यापूर्वी मार्च महिन्यात ट्रम्प प्रशासनाने निर्यात व्यापारात भारताला अमेरिकेकडून मिळत असणारी सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार भारताला 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रिफरन्सेस' (जीएसपी) कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले होते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू झाला होता. यामुळे निर्यातदार  भारतीय कंपन्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.


या निर्णयानंतर लगेचच मोदी सरकारनेही २८ अमेरिकी उत्पादनांवरील कर वाढवला होता. परिणामी जागतिक व्यापार युद्ध सर्वव्यापी होण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.